Wednesday, February 21, 2024

मातृभाषा दिन

 जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी

आपणा सर्वांना जागतिक मातृभाषा दिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा...!!

    हा मातृभाषा दिन साजरा करण्याची कल्पना कॅनडामध्ये राहणारे बांगलादेशी रफीकुल इस्लाम यांनी दिली. बंगाली भाषेचे  अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीही हा दिवस स्मरणात ठेवला जातो. 1952 मध्ये ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्या मातृभाषेचे अस्तित्व टिकवण्यासाठी 21 फेब्रुवारी रोजी आंदोलन केले. यात मृत्युमुखी पडलेल्या तरुणांच्या स्मरणार्थ युनेस्कोने मातृभाषा दिनासाठी हा दिवस निवडला.

    1999 मध्ये UNESCO ने 21 फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. भाषिक आणि सांस्कृतिक विविधता आणि बहुभाषिकतेबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी UNESCO ने सन 2000 पासून दरवर्षी 21 फेब्रुवारी रोजी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन साजरा करण्यास सुरुवात केली. पुढे 2000 सालापासून हा दिवस जगभरात साजरा केला जाऊ लागला.

    जगभरात, भाषा हे एक साधन आहे जे लोकांना एकमेकांशी जोडते आणि त्यांची संस्कृती प्रतिबिंबित करते. देशात अनेक मातृभाषा असू शकतात. एकट्या भारतात अशा १२२ भाषा आहेत, 

 बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये हिंदी, इंग्रजी, बंगाली, पंजाबी, अरबी, जपानी, रशियन, पोर्तुगीज, मंदारिन आणि स्पॅनिश यांचा समावेश होतो. जगातील भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि अनेक मातृभाषांबद्दल जागरूकता आणण्याच्या उद्देशाने दरवर्षी  मातृभाषा दिन साजरा केला जातो. 

    भाषा आपल्या मूर्त आणि अमूर्त वारसाचे जतन आणि विकास करण्याचे सर्वात शक्तिशाली साधन आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुभाषावादाला प्रोत्साहन देण्यासाठी, भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेला चालना देण्यासाठी जागतिक मातृभाषा दिवस साजरा करण्यात येतो.

       शिक्षण प्रत्येक व्यक्तीची गरज आहे. व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये शिक्षणाची भूमिका मोठी आहे. आणि प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण पोहोचविणे ही शासनाची जबाबदारी आहे.

      एखादी परकी भाषा शिकणे वेगळे व शिक्षणाचे माध्यम परकी भाषा असणे वेगळे.इंग्रजी मातृभाषा नसलेल्या देशात, प्रांतात इंग्रजी भाषा शिकायला हरकत नाही. पण शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असायला नको. आपल्या प्रांतभाषेतून, मातृभाषेतूनच शिक्षण मिळायला हवे. मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण प्रभावी ठरते. वाचनाची गोडी, चिंतन,मनन आकलन, अभिव्यक्ती, सृजनशीलता, नवनिर्मिती, साहित्य निर्मिती, इतिहासलेखन, इतिहास अध्ययन  मातृभाषेतूनच चांगलें होऊ शकते.

       शिक्षणाचे माध्यम ही त्या व्यक्तीची मातृभाषा असणे आवश्यक आहे. अर्थात ती भाषा लिखित भाषा असायला हवी. शिक्षण हे मातृभाषेतून, प्रांतभाषेतून दिले जायला हवे. जी भाषा आपली मातृभाषा असते, जडणघडणीची भाषा असते त्या भाषेतून शिक्षण  मिळाल्यास ते चटकन आकलन होते, समजते, उत्स्फुर्तपणे प्रकटीकरणही मातृभाषेतूनच चांगले होते. परक्या भाषेतून शिक्षण घेण्याची क्षमता असलेले लोक अपवादात्मक असतात. परक्या भाषेतून शिक्षण घेतल्यास ताण पडतो, मनावर आणि मेंदूवरसुद्धा. ऊर्जेचा र्हास भाषा शिकण्यातच होतो. परक्या भाषेतून शिकत असताना जिज्ञासा, तल्लीनता, एकाग्रता, रसग्रहण, रसास्वाद, चिंतन, मनन हवे तसे साधले जात नाही.

      देश-विदेशातील थोर नेत्यांनी, तत्वज्ञांनी शिक्षणातील मातृभाषेचे महत्त्व जाणून शिक्षण मातृभाषेतूनच मिळायला हवे असे सांगितलेले आहे.महात्मा गांधींनी शिक्षण मातृभाषेतून दिले जावे असे म्हटलेले आहे. असे म्हणणारांमध्ये रवींद्रनाथ टागोर, एपीजे अब्दुल कलाम, नेल्सन मंडेला,अब्राहम लिंकन, भारताचे माजी उपराष्ट्रपती श्री व्यंकय्या नायडु  यांनी आवर्जून मातृभाषेतून शिक्षण देण्याचे महत्व सांगितलेले आहे.

    ज्या देशांनी मातृभाषेतून, राष्ट्रीय भाषेतून शिक्षण देण्यावर भर दिला त्या देशांची, त्या देशातील लोकांची चांगली प्रगती झाली. जपान, जर्मनी, चीन, इटली, फ्रान्स, आस्ट्रेलिया, इस्त्रायल, स्विझरलँड, डेंमार्क, नार्वे आदी अनेक  देशांना आपली प्रगती करण्यासाठी इंग्रजीची वा परक्या भाषेची गरज भासली नाही. उलट मातृभाषेतून तेथे शिक्षण दिले गेल्याने तेथील समाजाची व देशाची उन्नती झाली. त्यातील काही देश तर विकसित झाले.

     देश विकसित होण्यामध्ये भाषेचे योगदान सुद्धा अनन्यसाधारण असते. त्या दिशेने विचार होणे गरजेचे आहे.आंम्ही परक्या भाषेतून, इंग्रजी भाषेतून शिक्षण घेण्यास मुलांना भाग पाडून मुलांच्या प्रगतीत,त्यांचे व्यक्तीमत्व विकासात अर्थात देशाचे प्रगतीत अडथळे निर्माण करीत आहोत. परक्या भाषेतील शिक्षणाचे माध्यमातून आम्ही नौकर तयार करू शकतो उद्योजक, संशोधक, दर्जेदार साहित्यिक, मालक तयार करू शकत नाही. परकी भाषा शिकणे गैर नाही तर शिक्षणाचे माध्यम हे परकी भाषा असायला नको. मातृभाषा, प्रांतभाषा वा राष्ट्रभाषा हे शिक्षणाचे माध्यम असायला हवे.

   आपला इतिहास व संस्कृती यांचे अध्ययन, अभ्यास आपण मातृभाषेतूनच चांगल्या तऱ्हेने करू शकतो. इतिहासाच्या अभ्यासात जिवंतपणा आणण्याचे सामर्थ्य, राष्ट्रभक्त नागरिक निर्माण करण्याचे सामर्थ्य मातृभाषेतच असते. परक्या भाषेतून तो जिवंतपणा साधला जात नाही. इतिहासाचा अभ्यास प्रेरणादायी,व्यक्तीविकासास व राष्ट्रनिर्मितीस पूरक असतो. इतिहास व्यक्तीला घडविण्याचे, आकार देण्याचे काम करतो. इतिहास मातृभाषेतून शिकायला मिळाल्यास प्रभावी अध्ययन होऊन समर्थ, आत्मनिर्भर व राष्ट्रभक्त पीढी  निर्माण होऊ शकते. या दृष्टीने मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनमोल आहे.

    आपण आपला देश ज्ञानाचे भांडार असल्याचे सांगतो, आपली संस्कृती प्राचीन असल्याचे सांगतो. भारतीय संस्कृतीचे गोडवे गातो.पण आजहीआम्ही ज्ञाननिर्मिती मातृभाषेतून न करता परक्या भाषेतून शिक्षण देतो. पण याचा विपरीत परिणाम शिक्षणावर होतो. परिणामकारक असे शिक्षण होत नाही. शिक्षणात मुलांना उत्साह, आनंद वाटण्याऐवजी भीती वाटते, ताण येतो,न्यूनगंड निर्माण होतो. पाहिजे तसे आकलन होत. परक्या भाषेतून संशोधन, नवनिर्मिती, चिंतन, मनन, साहित्यनिर्मिती, इतिहासलेखन, संशोधन ह्या गोष्टी तर फार दूरच्या आहेत. मुले इंग्रजीतून बोलताना मोकळेपणाने, उत्स्फुर्तपणे बोलत नाहीत. जपान, फ्रांन्स, चिनला प्रगती करण्यासाठी इंग्रजीची वा परक्या भाषेची गरज भासली नाही.- सर्वसाधारण शिक्षणासोबतच वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण व संशोधन हेही ते देश जर मातृभाषेतूनच करू शकत असेल तर... आपली संस्कृती, आपला देश विशाल आणि समृद्ध आहे आपल्याला अडचण येण्याचे कारण काय? 

    भारताला विकसित व विश्वगुरू बनवण्यासाठी भारतीयांचे शिक्षण भारतीय भाषेतून, राष्ट्रीय भाषेतून, प्रांतभाषेतून, मातृभाषेतूनच व्हायला हवे.शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषाच असायला हवे.

      आपणा सर्वांना जागतिक मातृभाषा दिनाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा...!!


No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...