"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Friday, January 02, 2026

शिकण्यासाठी जागे व्हा

१८५४ साली क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मराठीमध्ये आधुनिक कवितेची सुरुवात केशवसुतांनी केली हा समज हितसंबंधी अभिजन वर्गाने जनमाणसांत रूढ केला. पण केशवसुतांची कविता ५० वर्षानंतरची आहे. त्याच्या आधी पन्नास वर्ष सुमारे १८५४ साली सावित्रीबाईंचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्याच्यामध्ये,


'शिक्षणाने मनुष्यत्व | पशुत्व हटते पहा ||' 


शिकलं की माणूसपण येतं आणि जनावरपण जे आहे ते दूर होतं अशी मांडणी सावित्रीबाईंनी केलेली आहे. त्या कविता, समाजप्रबोधन करणाऱ्या कविता आहेत, विचारप्रवर्तक कविता आहेत, निसर्गाच्या कविता आहेत. संत तुकारामांनी जसं म्हटलं होतं,


'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे |'


तसं निसर्गाशी बोलणाऱ्या, फुला-फळांशी बोलणाऱ्या, झाडांशी बोलणाऱ्या, बहुजन समाजाच्या शिक्षणाची काळजी वाहणाऱ्या, त्यांच्या उद्धारासाठी, त्यांचे दुःख, दारिद्र्य दूर करण्यासाठी, त्यांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या सावित्रीबाई आपल्याला त्यात दिसतात. सावित्रीबाईंच्या कवयित्री म्हणून असलेल्या योगदानाशी निव्वळ पहिल्या कवयित्री असं नाही, आधुनिक कवयित्री असं नाही तर त्याच्या पलीकडं जाऊन अतिशय सशक्त, अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काव्यलेखन करणाऱ्या सावित्रीबाईंची 'शिकण्यासाठी जागे व्हा' ही कविता-


*शिकण्यासाठी जागे व्हा*


उठा बंधुनो अतिशूद्रांनो जागे होऊनि उठा

परंपरेची गुलामगिरी ही

तोडणेसाठी उठा 

बंधूंनो शिकणेसाठी उठा ||धृ||


गेले मेले मनु पेशवे 

आंग्लाई आली 

बंदी मनुची विद्या घेण्या

होती ती उठली ||


ज्ञानदाते इंग्रज आले 

विद्या शिकुनि घ्या रे 

ऐसी संधी आली नव्हती

हजार वर्षे रे ||


मुलाबाळांना आपण शिकवू 

आपणसुद्धा शिकू 

विद्या घेऊनी ज्ञान वाढवून

नीतीधर्महि शिकू ||


नसानसातून इर्षा खेळवू

विद्या मी घेईन 

शूद्रत्वाचा डाग हा माझा

निपटून काढीन ||


राज्यात बळीच्या 

आम्हास विद्या घडो 

यशाची आमच्या 

दुंदुभी नगारे झडो

'इडापिडा टळो' 

या कार्यी भट न पडो ||


असे गर्जूनी विद्या शिकण्या

जागे होऊन झटा 

परंपरेच्या बेड्या तोडुनि

शिकण्यासाठी उठा ||१||


- सावित्रीबाई फुले 



धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

शिकण्यासाठी जागे व्हा

१८५४ साली क्रांतिज्योती सावित्रीमाईंचा 'काव्यफुले' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. मराठीमध्ये आधुनिक कवितेची सुरुवात केशवसुतांनी केली ...