१५ आॕक्टोबर या दिवशी आपल्या भारताचे मिसाईल मॅन, आदरणीय डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम साहेबांची जयंती भारतभर आदरपूर्वक साजरी केली जाते.
आदरणीय डॉ. अब्दूल कलाम साहेबांचे जीवनचरित्र आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. आदरणीय कलाम साहेब हे भारतीय विज्ञान विश्वाला असे पोरके करुन निघून गेलेत, जणू त्यांच्या अकाली जाण्यामूळे भारताचे अग्नि पंखच विझलेत.
पण या विझलेल्या पंखांनी आपल्या हयातभर, भारताला गरुड झेपेची ताकद दिलीय. प्रेरणा दिली. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनचरित्रातून नव्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून त्यांची जयंती आमच्या शाळेत "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आली.
वाचनामुळे विचारांची निश्चित अशी बैठक तयार होण्यास मदत होते, वाचनामुळे विचारही बदलतात, असे वाचनाचे अनेक फायदे आपल्याला सांगणारे बरेच जण असतात. मात्र, काय वाचावे आणि काय वाचल्याने आपल्याला फायदा होईल, हे सांगणारे फारच कमी असतात. एखाद्याचे वाचन दांडगे आहे असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच्या लहानपणापासून जाड जाड कादंबऱ्यांचा फडशा पाडला असेल, असे गृहीत धरले जाते. मात्र, गोष्टीच्या पुस्तका पासून सुरू झालेली वाचनाची भूक वयाप्रमाणेच वाढत जाते, हेही तितकेच खरे.
'वाचणे' म्हणजे नुसती अक्षर ओळख नव्हेच. वाचन या शब्दाचा आपण सतत अर्थ 'अवांतर वाचन' असाच घेतला पाहिजे. हल्लीची मुले वाचत नाही अशी बहुतेक पालकांची तक्रार असते. वाचन हा खरं तर सतरावा संस्कार आहे.
लहानपणापासूनच तो मुलांवर व्हायला हवा. इतकेच नव्हे तर वयाच्या १२-१५ व्या वर्षापर्यंत त्याचा पाठपुरावा व्हायला हवा, तरच हा आनंदाचा ठेवा आयुष्यभर साथ देतो कारण बालसाहित्याच्या बीजातूनच वाचनसंस्कृतीचा डेरेदार वृक्ष आकारास येतो हे निर्विवाद सत्य आहे.
वाचनाने माणूस ज्ञानी वा प्रगल्भ होतो, समृद्ध होतो, असे बोलले जाते. मात्र, वाचन हे मेंदूसाठी खाद्य आहे. आपल्या क्षणभर ही न थांबता सतत विचार करत राहणाऱ्या मेंदूला वेळोवेळी वाचनाचे खाद्य पुरवायलाच हवे अन्यथा 'रिकामे मन नी सैतानाचे घर' अशी अवस्था मनाची होवून मन हे कदाचित विघातक गोष्टींकडे वळू शकते. वाचन हा केवळ दैनंदिन जीवनातला एक सोपस्कार नाही, अथवा साक्षरतेचे कौशल्य दाखविणारे ते साधनही नाही. वाचन हा संस्कार आहे.
!!वाचाल तरच वाचाल !!
'वाचाल तर वाचाल !' हे ब्रीद मानू या धन,
वाचन संस्कृती वर्धन, हेच पाळावे ते वचन.
No comments:
Post a Comment