"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

Saturday, October 5, 2024

नवरात्र नव आवाहन

उत्सव नवरात्रीचा, 
उत्सव शक्तीचा, 
उत्सव जागरूक हिंदू अस्मितेचा,

  दरवर्षी त्याच घटरूपी शरीरातील भावना बदलू शकतात. जसं पेरावं तसं उगवतं ना? चला आपण स्वतः मधील दैवी अंंशाला नव्यानी ओळखुया, जागवुया आणि पुजुया.

🚩♥️🚩

🔹पहिली माळ -

आधी आत्मा! पहिल्या दिवशी छान नाहुन माखून, खुषीने जे आवडेल ते लेवून, जे आवडेल तेच करावं. करण्याआधी मनाला एक प्रश्न मात्र विचारायचा आहे, मी हे का करते आहे? मला आवडतय म्हणुन? का जग करतय म्हणुन ? मला करून बघायचय म्हणून? आजचा दिवस तुमचा असावा, जगाची नक्कल करण्याचा नाही. तुम्ही स्वतःशी बसून स्वतःला विचारायचं आहे की,  तुम्ही जगापेक्षा वेगळ्या का आहात? मग तेच करा. कुणी छान स्वयंपाक करेल, कुणी पेंटिग, कुणी छान नटेल, कुणी देवासमोर बसुन मनोभावे पूजा करेल, कुणी तरी कुणाला तरी माफ करेल किंवा माफी मागुन स्वत:च मन मोकळं करेल. मनातलं स्वत:ला आवडणारच फक्त करून संध्याकाळी छान आरती करा. दिव्यात समाधानानं उजळणारा तुमचा चेहरा बघून ती देवी आई नक्की सुखावणार.

🚩♥️🚩

🔹माळ दुसरी -

    तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रायोरिटीज काळानी जरूर बदलणार, पण तरीही अत्यंत महत्वाची असणारी माणसं तिच रहाणार. आज त्यांच्याकडे पुर्ण लक्ष द्यायचं, सांगुन सवरून बरका. त्यांच्या आवडीचं काही शिजवा, त्यांना भेट आणा, ओवाळून हातात द्या आणि त्यांच्या पर्यंत हे जरूर पोचवा कि तुम्ही माझ्यासाठी खूप महत्वाचे आहात. आपण सेल्फी टाकताना इतर दिवशी लाजत नाही, ना नवरात्रीचे रंग पाळताना. मग आपल्याच माणसांवरतं प्रेम (जग) जाहिर करायची कसली लाज? विश्वास ठेवा. फार मोठी ताकद मिळते. इडापिडा टळते, एकी वाढते. कुठल्या मातेला आपल्या लेकरांना समाधानी बघुन आनंद नाही बरं होणार?

🚩♥️🚩

🔹माळ तिसरी -

    आज जाऊया त्या सगळ्यांकडे, ज्यांच्याबरोबर आपण आयुष्यातला बराच काळ काढतो. मग ते कुटूंबीय असतील किंवा आपल्या कामावरते सहकारी किंवा सोसायटी मधील मैत्रिणी. त्यांना काहीतरी छानसं लहानसं भेट द्या, बरोबर पेढा किंवा खाऊ द्या. घरी बोलवा किंवा बाहेर जाऊन भेटा. पण तुम्ही हे मनापासून करताय हे त्यांना जाणवलं कि झालं. छान आनंदात संध्याकाळी आरती कराल. नक्कीच!

🚩♥️🚩

🔹माळ चौथी -

   आजचा दिवस आपल्या मदतनीसांचा. मग कामवाल्या काकु असतील किंवा वाॅचमन किंवा कचरा साफ करणार्‍या मावशी. त्यांना आवर्जून भेट, खाऊ किंवा पैसे द्या, ते ही मानाने! आई बघतीये! तिचाच एक तेजकण दुसर्या तेजकणाचं कौतुक करताना!

🚩♥️🚩

🔹माळ पाचवी -

    आजुबाजुला असलेल्या जीवजंतू, प्राणी पक्ष्यांवर आपण जाणीवपूर्वक कायमच अन्याय करतो. आम्ही मानव इथे रहातो, म्हणुन आमची ही पृथ्वी. तुम्ही आमचे खाद्य किंवा सेवक, किंवा तुम्ही आम्हाला नकोत. हे कोण परग्रहवासी का मग? ती नाहीत का मुलं त्या देवीची? शहाणसुरते निर्णय घेऊन त्यांना मदत करूया. अनेक संस्था आहेत. कदाचित त्यांना किंवा घरातल्या प्राण्यांसाठी काही करा. पुर्वी गोग्रास ठेवायची पद्धत अशाच भावनेतून असावी का?

🚩♥️🚩

🔹माळ सहावी -

   आज आजूबाजूच्या वातावरणातील झाडं, वनस्पती, फुलं यांचं महत्त्व ओळखायचं आहे. एक रोपटं तरी लावूया? त्यांना थोडसं पाणी, प्रेम आणि सूर्यप्रकाश पुरतो.

🚩♥️🚩

🔹माळ सातवी -

   आपलं जग इतकच लहान असतं का? आज कुणाला पुजाल? तुमच्या रहात्या वास्तुला आणि कामाच्या जागेला. त्यातील वापरत्या वस्तूंना. स्वच्छता तर झालेली असतेच आधीच. जस्ट एक फुलांची माळ, रांगोळी आणि धूप. वातावरणात सकारात्मकता तुमच्या परीनी भरून टाका.

🚩♥️🚩

🔹माळ आठवी -

   आज अष्टमी. प्रचंड उर्जा देणारा दिवस. आज ठरवा तुम्ही तुमच्या, कुटुंबाच्या तसच ह्या जगाच्या हानीला हातभार लावणार नाही. काय त्यागू शकता तुम्ही? प्लॅस्टिक, नाॅनस्टिक, अ‍ॅल्युमिनियमच्या फाॅईल्स... अजुन काय आणि का? योग्य गटांमधे चर्चा करा. चुकीच्या गोष्टी जग करतय म्हणून करू नका. इथं दुर्गारूप जरूर धारण करा. तुम्ही जे सोडणार, त्याचा जरूर गवगवा करा. पर्यावरणाची हानी एक टक्क्यानी जरी कमी झाली तरी दैवी उर्जा नक्कीच जास्त प्रबळ होईल.

🚩♥️🚩

🔹माळ नववी -

   आज आसमंतातल्या सकारात्मक उर्जेला आवाहन करा. दिवसातून एकही नकारात्मक विचार जाणीवपूर्वक बोलु नका. सर्वांसाठी आणि स्वतः साठीही मंगल इच्छा व्यक्त करा. बघा पुर्ण होतात कि नाही. जमलच तर आजपासून ध्यानात बसायला सुरूवात करून बघा.

🚩♥️🚩

🔹दसरा -

   सुख म्हणजे आणखी काय असतं आणि घरबसल्या ते कसं मिळतं ते जरूर अनुभवा. मनापासून दैवी शक्तीचे आभार माना.


   ह्या व्रतासाठी नियम...!

मनात असेल ते आणि तितकंच करा. नियम नाही हाच नियम. मनापासून दुसऱ्या कुणाचंही नुकसान न करता, स्वतः सह सर्वांचं मंगल चिंतण्यासाठी व्रतस्थ रहाता आलं तर का नाही?     


देविका श्रीकांत...

🚩♥️🚩

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

राष्ट्रीय शिक्षण दिन

  ११ नोव्हेंबर-  स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री  मौलाना अबुल कलाम आझाद     यांच्या जयंती निमित्त दरवर्षी ११ नोव्हेंबर हा दिवस ‘राष्ट्री...