"प्रभावी सूत्रसंचालन" या ब्लॉगला भेट देणाऱ्या आपण सर्व मान्यवरांचे सहर्ष हार्दिक स्वागत आहे..!!

वरदविनायक महाडचा

 चौथा गणपती – महाडचा वरदविनायक 

    रायगडच्या महाड मध्ये वरदविनायक मंदिर आहे. एका मान्यते नुसार वरदविनायक भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे वरदान देतो. या मंदिरात नंदादीप नावाचा दिवा असल्याचीही एक आख्यायिका आहे जो गेल्या अनेक वर्षांपासून अखंड तेवत आहे. अष्टविनायकात चौथा गणपती म्हणून महाडचा "वरदविनायक" ओळखला जातो. या गणपतीची एकदम जवळ जाऊन पूजा करता येते.

★इतिहास-
     हे देऊळ अष्टविनायकांपैकीएक आहे.या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असला तरी मंदिराचा गाभारा पेशवेकालीन असून तो हेमांडपंथी आहे. हा गणपती पुरातन कालीन असल्याचे सांगितले जाते.गणेश येथे वरदविनायक (समृद्धी व यश देणारा) या रूपात रहात असे. येथील मूर्ती स्वयंभू असून धोंडू पौढकर यांना ती येथील तलावात १६९० साली सापडली. १७२५ साली कल्याणचे सुभेदार रामजी महादेव भिवळकर यांनी येथे देऊळ बांधले व महाड गावही वसवले.

★ मंदिर -
    या देवळाच्या चारही बाजूस चार हत्तींच्या मूर्ती आहेत. ८ फूट बाय ८ फूट असलेल्या या देवळाला २५ फूट उंचीचा कळस आहे. कळसाचा सर्वात वरचा भाग हा सोन्याचा आहे. पूर्वाभिमुख असलेल्या या मूर्तीच्या शेजारी सतत दिवा पेटवलेला असतो, असे म्हणतात की हा दिवा १८९२ पासून पेटता आहे. 

"श्री. वरद विनायक"

    महाडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी चौथा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

     या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व डाव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

★आख्यायिका-
     फार प्राचीन काळी भीम नावाचा एक शूर व दानी राजा होऊन गेला. त्याला मूलबाळ नसल्याने तो दुःखी होता. तेव्हा तो आपल्या राणीसह अरण्यात गेला. त्याचे दुःख जाणून विश्वामित्र ऋषींनी त्याला एकाक्षर मंत्राचा जप दिला. मग राजाने उग्र तपश्चर्या सुरू केली. त्यामुळे विनायक त्याच्यावर प्रसन्न झाला. ''तुला लवकरच पुत्रप्राप्ती होईल'' असा त्याने राजाला वर दिला.

     काही दिवसांनी राजाला एक पुत्र झाला. त्याचे नाव रुक्मांगद. रुक्मांगद मोठा झाल्यावर राजाने सारा राज्यकारभार त्याच्यावर सोपविला व त्यालाही एकाक्षर मंत्राचा जप करण्यास सांगितले.

    एकदा रुक्मांगद शिकारीसाठी वनात भटकत असता तो वाचक्नवी ऋषींच्या आश्रमात गेला. त्या ऋषीच्या पत्नीचे नाव होते मुकुंदा. रुक्मांगदाला पाणी देताना मुकुंदा त्याच्यावर अनुरुक्त झाली, पण रुक्मांगदाने तिची इच्छा पूर्ण केली नाही. त्यामुळे कामविव्हल झालेल्या मुकुंदेने 'तू कुष्ठरोगी होशील' असा रुक्मांगदाला शाप दिला.

    शाप मिळता क्षणीच सुवर्णाप्रमाणे कांती असलेले रुक्मांगदाचे शरीर कुष्ठरोगाने विद्रूप झाले. त्यामुळे दुःखी झालेला रुक्मांगद अरण्यात भटकत असता त्याला नारदमुनी भेटले. त्यांच्या आदेशानुसार रुक्मांगदाने कदंब नगरातील कदंब तीर्थात स्नान केले व तेथील चिंतामणी गणेशाची आराधना केली. त्यामुळे रुक्मांगद रोगमुक्त झाला.

    इकडे त्या मुकुंदेची अवस्था लक्षात घेऊन इंद्राने रुक्मांगदाचे रूप घेतले व मुकुंदेची इच्छा पूर्ण केली. त्याच्यापासून मुकुंदेला पुत्र झाला. त्याचे नाव गृत्समद. हाच तो ऋग्वेदातील प्रसिद्ध मंत्रदृष्टा व द्वितीय मंडळाचा करता. गृत्समदाच्या जन्माची कथा सर्वांना माहित झाली होती. त्यामुळे त्याचा पदोपदी पाणउतारा होऊ लागला. मातेच्या पापाचरणामुळे सर्वजण गृत्समदाला हीन लेखू लागले. तेव्हा गृत्समदाने आईकडून सत्य जाणून घेतले व तिला शाप दिला. मग तो पापक्षालनार्थ पुष्पक (भद्रक) वनात तप करू लागला. त्याने विनायकाची आराधना केली. त्यामुळे विनायक प्रसन्न झाला. विनायकाने त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा तो म्हणाला, ''तू याच वनात वास्तव्य करून भक्तांच्या इच्छा पूर्ण कर.'' विनायकाने ते मान्य केले व त्या वनात राहू लागला. ते पुष्पक किंवा भद्रक वन म्हणजेच आजचे महाड क्षेत्र. या ठिकाणी गृत्समदाला वर मिळाला म्हणून येथील विनायकाला 'वरद विनायक' म्हणतात. गृत्समद हा गाणपत्य संप्रदायाचा आद्य प्रवर्तक समजला जातो. पुरातन काळात महडचे नांव मणिपूर वा मणिभद्र होते.

★भौगोलिक -
   मुंबई-पनवेल-खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलिकडे ६ कि.मी. अंतरावर उजवीकडे महडसाठी रस्ता जातो. मुंबई-महड अंतर ८३ कि.मी आहे.
मुंबई-पुणे रेल्वेमार्गावर कर्जतपासून महड २४ कि.मी. आहे.

No comments:

Post a Comment

धन्यावाद आपले ... तुमची प्रतिक्रिया आम्हाला प्रेरणा देणार

Happy Hormones

चार संप्रेरके जी माणसाला‌ आनंदी ठेवतात. १. एंडॉर्फिन्स २. डोपामाईन ३. सेरोटोनिन ४. ऑक्सिटोसिन 🌸 आनंदी राहायचंय? मग ही ४ "Happy Hormone...