तर, वाल्या कोळयाच्या बायकोसारखी....!!
रामायण आपल्या संस्कृतीचा ठेवा असून रोजच्या जगण्यात, पावलोपावली त्याचे दाखले दिले जातात...!
'पुत्र असावा तर, प्रभुरामासारखा'!
'पती असावा तर, मर्यादापुरूषोत्तम श्रीरामासारखा !',
भाऊ असावा तर, लक्ष्मणासारखा !',
'पत्नी असावी तर, सीतेसारखी !'
'भक्ति व शक्ति असावी तर, ती हनुमंतासारखी'
★बायको वाल्याकोळयाची....★
सहजच माझ्या मनात एका प्रश्नाने घर केले, बायको कशी असावी?
मी तो प्रश्न आजपर्यंत बऱ्याच जणांना विचारला, खूप साऱ्या जणांनी त्याचे उत्तर त्यांना आवडणाऱ्या वेगवेगळ्या स्त्रियांचे दिले. अगदी रामायण महाभारतात असलेल्या आदर्श स्त्रिया ते अगदी आताच्या आघाडीवर असलेल्या अभिनेत्रीचे! खरं तर या सर्व दाखल्यापूर्वी आणखी एक दाखला आवर्जून द्यायला हवा. तो म्हणजे,....
★ बायको असावी तर वाल्या कोळ्याच्या बायकोसारखी !'
कारण तीच खरी रामायण कर्त्याची 'कर्ती 'आहे ! हे दुर्लक्षीत सत्य कायमच दुर्लक्षीतच राहिले आहे.
रामायणकर्त्या वाल्मिकी ऋषीच्या जडणघडणीसंबधी, अगदी जुजबी इतिहास सांगितला जातो.
वाल्याकोळी वाटसरूंना जंगलात
अडवून, प्रसंगी त्यांचे मुडदे पाडून, त्यांची लूट करुन चरितार्थ चालवायचा.