सिद्धटेकचा सिद्धिविनायक


दुसरा गणपती– सिद्धटेकचा सिद्धेश्वर 

 सिद्धटेक (सिद्धिविनायक) हे अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. भीमा नदीवर हे मंदिर आहे. हे मंदिर सुमारे 200 वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. भगवान विष्णूंनी सिद्धटेकमध्ये सिद्धी प्राप्त केली होती असे म्हणतात. सिद्धिविनायक मंदिर डोंगराच्या माथ्यावर बांधलेले आहे. त्याचा मुख्य दरवाजा उत्तरेकडे आहे. या मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी डोंगराचा प्रवास करावा लागतो.

     हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. श्री विष्णूला सिद्धी प्राप्त करून देणारा, कार्य सिद्धीस नेणारा हा सिद्धिविनायक अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेचा एकमेव गणपती आहे. अष्टविनायकांमधील हा दुसरा गणपती आहे..आख्यायिकेनुसार हा गणपती असलेली संपूर्ण टेकडीच दैवी शक्तीने प्रभावित असून तिच्या सलग २१ दिवस २१ प्रदक्षिणा केल्यास जीवनात अर्धवट राहिलेली, विघ्न बाधित कार्ये सिद्धीस म्हणजे पूर्णत्वास जातात..यासाठी सिद्धटेकची ख्याती आहे..

★पौराणिक कथा -

येथील गणेश मूर्तीची सोंड उजवीकडे वळलेली आहे. सामान्यतः गणेशाची सोंड त्याच्या डावीकडे वळविलेली असते.पण असे मानले जाते की उजव्या सोंडेचा गणेश हा खूपच शक्तिशाली आहे, परंतु हे जरी खरे असले तरी त्याला प्रसन्न करणेही तेवढेच कठीण काम आहे.  हे एकमेव असे अष्टविनायक मंदिर आहे जिथे देवतेची सोंड उजवीकडे आहे. परंपरेने, ज्याची सोंड उजवीकडे आहे त्या गणरायाचे नाव "सिद्धी-विनायक" असे ठेवले आहे, सिद्धी देणारा ("सिद्धी, यश", "अलौकिक शक्ती"). सिद्धटेक मंदिर म्हणूनच जागृत क्षेत्र मानले जाते ..येथे देवता अत्यंत शक्तिशाली असल्याचे म्हणले जाते.
    प्राचीन काळी ब्रह्मदेवाने विचार केला की, आपण सृष्टी निर्माण केली पाहिजे. त्यासाठी त्यांनी श्रीगणेशाच्या आज्ञेनुसार तपश्चर्या सुरू केली. गणेशाने त्यांना एकाक्षरी मंत्र दिला होता. ब्रह्मदेवाच्या कठोर तपश्चर्येने श्रीगणेश प्रसन्न झाले आणि ब्रह्मदेवाला म्हणाला, ‘तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.’ मग देवाने संपूर्ण सृष्टी निर्माण केली. त्यावेळी क्षीरसागरात झोपलेल्या भगवान विष्णूंच्या कानातून मधु आणि कैटभ हे दोन राक्षस जन्माला आले. त्यांनी ब्रह्मदेवाचा छळ सुरू केला. संपूर्ण पृथ्वी हादरली. तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूंना जागे केले. विष्णू आणि मधु-कटभ यांच्यात घनघोर युद्ध झाले. पाच हजार वर्षे युद्ध झाले तरी विष्णू त्या राक्षसांचा वध करू शकले नाहीत. म्हणून ते भगवान महादेवांकडे गेले. युद्धाच्या सुरुवातीला तू गणेशाची स्तुती केली नाहीस म्हणून तुला विजय मिळत नाही, असे शंकर म्हणाले. त्यानंतर विष्णू एका पवित्र टेकडीवर आले. तेथे त्यांनी ‘श्री गणेशाय नमः’ या सहा अक्षरी मंत्राने श्रीगणेशाची आराधना केली. त्या तपश्चर्येने विनायक (गणेश) प्रसन्न झाले. विनायकाच्या कृपेने भगवान विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली. मग त्यांनी मधु-कैटभाचा वध केला.
   विनायकाने ज्या ठिकाणी प्रसन्न होऊन वरदान दिले त्या ठिकाणी भगवान विष्णूंनी मोठे मंदिर बांधले आणि त्यात गंडकिशिलाच्या विनायकाची मूर्ती बसवली. या ठिकाणी विष्णूचे कार्य सिद्ध झाले, म्हणून या स्थानाला सिद्धटेक आणि येथील विनायकाला ‘श्रीसिद्धिविनायक’ असे म्हणतात. तेव्हापासून सिद्धटेक हे गणेशाचे पवित्र मंदिर म्हणून ओळखले जाते.

★इतिहास -
    पेशवेकालीन महत्त्व लाभलेल्या ह्या सिद्धिविनायकाच्या मंदिराचा गाभारा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. देवाचे मखर पितळेचे असून सिंहासन पाषाणाचे आहे. मधु व कैटभ या असुरांशी भगवान विष्णू अनेक वर्षे लढत होते. मात्र, या युद्धात त्यांना यश प्राप्त होत नव्हते. तेव्हा शंकराने विष्णूला गणपतीची आराधना करायला सांगितली. याच ठिकाणी गणपतीची आराधना करून विष्णूने असुरांचा वध केला.

   छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या देवळाचा रस्ता पेशव्यांचे सरदार हरिपंत फडके यांनी तयार केला. हरिपंत फडके यांचे सरदारपद पेशव्यांनी काढून घेतले, तेव्हा फडक्यांनी या मंदिरास २१ प्रदक्षिणा घातल्या. त्यानंतर २१ दिवसांनी त्यांची सरदारकी त्यांना परत मिळाल्याची आख्यायिका सांगितली जाते.

विलोभनीय पवित्र निसर्ग परिसर लाभलेल्या अशा या मंदिराच्या जवळून म्हणजे अगदी सिद्धटेक टेकडीच्या पायथ्याशीच भीमा नदी वाहते.

★मंदिर -
   मंदिरातील सिद्धिविनायकाची मूर्ती स्वयंभू असून ती तीन फूट उंच व अडीच फूट रुंद आहे. आहे. मूर्तीचे तोंड उत्तरेकडे असून ती गजमुखी आहे. सोंड उजवीकडे असल्याने सोवळे कडक आहे. त्यामुळे हा गणपती भक्तांसाठी कडक मानला जातो. गणपतीने एक मांडी घातली असून त्यावर ऋद्धि-सिद्धी बसलेल्या आहेत. प्रभावळीवर चंद्र, सूर्य, गरुड यांच्या आकृत्या असून मध्यभागी नागराज आहे. या देवळाला एक प्रदक्षिणा घालायची म्हणजे १ किलोमीटर चालावे लागते.

★भौगोलिक -
   श्री क्षेत्र सिद्धटेक अहमदनगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात भीमा नदीच्या काठावर वसलेले एक खेडेगाव आहे.
सिद्धटेकला जाण्यासाठी यात्रेकरूंना सोयीचे रेल्वे स्थानक म्हणजे दौंड. दौंड ते सिद्धटेक हे अंतर १८ कि.मी. आहे. दौंडवरून शिरापूर येथे  गाड्या थेट मंदिरापर्यंत जातात.

No comments:

Post a Comment

थोर व्यक्तीची जयंती सविस्तर माहिती

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

  हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.    मराठ...